Monday 29 August 2016

टाळी - शतशब्द कथा


काठीवर डाव्या पायाचा भार देत तिने एकापुढे हात पसरले. पाऊल पुढे टाकत त्याने मान हलवली. उपाशीपोटी ती हात पसरत पुढे निघाली. एक, दोन रुपयांपेक्षा जास्त मिळत नव्हते. नळावर पाणी पीत असताना एका टाळीने तिचं लक्ष्य वेधून घेतलं. एक हिजडा रेल्वेमध्ये टाळी वाजवून हात पसरत होता/ती. लोक लगबग करून दहा रुपयाची नोट हातावर टेकवत होते. तिने हातातल्या एक रुपयांकडे बघून आशाळभूत नजरेने हिजड्याच्या हातातल्या दहा रुपयांकडे बघितले. मनातल्या मनात स्वतःच्या नशिबाला दूषणे देत ती निघाली.
एकाएकी तिचा चेहरा उजळला. ती थबकली. तिला काहीतरी सापडलं होतं.
तिने नळावर चेहरा धुतला. रुपयाचं पान खाऊन तोंड रंगवलं. आणि हातातली काठी टाकून जोरात टाळी वाजवली.


Friday 10 June 2016

'डुप्लीकेट' लोकशाही

(मायबोलीवर पूर्वप्रकाशित)

बबन्यानं दुकानाचं दार आपल्याकडे ओढून कडी, कुलूप काढलं. दुकान उघडून मेजावर, खुर्चीवर आणि सामानावर फडकं मारुन तो फतकल मारीत लाकडाच्या खुर्चीत बसला. आज दुकान उघडायला जरा उशीरच झाला होता.आपलं रोजचं गिऱ्हाईक लांब असलेल्या दुसऱ्या दुकानात गेलं कि काय अशी शंकाहि त्याच्या मनात आली. पण लगेच त्याच्या दुसऱ्या मनाने त्याची शंका खोडून काढली. कारण त्या दुकानात उधारी चालत नसे. बबनराव बऱ्यापैकि उधारी ठेवत म्हणून गावकरी बबन्याच्याच दुकानात जास्त जातदुकान उघडायला जरा उशीर झाला तरी जरा कड काढतंच.
आता खेड्यातलं दुकान म्हणल्यावर त्यात विकायला दुसरं काय असणार साखऱ्या अन् पत्ति.
पण नाही बबन्याने साखर, पत्तीपासून ते पार पेट्रोल आणि मोबाईल रिचार्ज पर्यंत सगळं ठेवलं होतं. नुसत्या साखऱ्या अन् पत्तिनं घर चालवायचं कसं?
बबन्या खुर्चीत बसतोय न बसतोय तोवरच त्याची भोवनी दारात हजर होती.
"काय बबनराव लई उशीर केला दुकान उगडायला?" आल्या आल्या शंकरआपाच्या बंड्या ने विचारलं.
"हां, जरा उशीरच झाला बग." बबन्या, बंड्याचा रोजचा खुराक 'सुर्य छाप' ची पुडी काढत बोलला.
"जरा लवकर उगडत जा कि राव, कामं खोळंबत्यात 'सकाळची'" एवढ बोलून बंड्याने शर्टच्या खिशातून पाचशेची नोट काढली.
बबन्या 'सकाळची' कोणती कामं हे उमजून मान हलवत होता. बंड्याने नोट काढली तसा तो बोलला.
"चिल्लर दे रे, चिल्लर ची लय बोंब हाये बग."
"आरं म्या तरी कुटंनं आणू रं, न्हायी कि चिल्लर." बंड्या खिसे चाचपत बोलला.
"आरं भवनीच तुज्या हातून हाये आज; बग असतेल." बबन्या आशाळभूत नजरेने बंड्याकडे बघत होता.त्याचा एक दंडक होता. एरव्ही कितीही उधारी होऊ द्या पण भोवनीच्या वेळेस तो रोख पैसे घ्यायचा.
भोवनी ला उधारी केली कि त्या दिवशी धंदा चांगला होत नाही असा त्याचा समज होता.
आणि हे माहित असल्यामुळेच बंड्याने जाऊन कुठून तरी १० रुपये आणून बबन्याच्या हातात एकदाचे टेकवले.
बंड्या गेला अन् पकाभाऊ बिड्या घ्यायला आले. आले तसे त्यांनी हजाराची नोट पुढं करून बिड्यांच बंडल मागितलं.
"पकाभाऊ धा रुपायच्या बंडलाला हजाराची नोट व्हय?" बबन्या करवादला.
"आरं चिल्लर न्हायी कि." पकाभाऊ खोलवर खिशात हात घालत बोलले.
"बरं, ऱ्हाउद्या आता, पुन्ना द्या." बबन्या उधारीची वही काढत बोलला.
"हां बराय, टिपून ठेव बाबा परत इसरायचो म्या." असं म्हणून ते घाई घाईत निघून गेले.
अजून एक दोन गिऱ्हाईकासोबत वरील वाक्यांचीचं उजळणी झाली तसं बबन्या विचारात पडला.
"ह्याच्या बायला, काय सगळ्यासंनीच काय घबाड गावलं का काय?, कोण पण येतंय अन् हजार, पाचशेची नोट काडतंय. ते आप्याचं बंड्या खिशात कदि दमडा नसतो त्यच्या, उधारी झाली कि बापाकडनं मागून धा, पाच रुपये हातावर टेकावतय अन् आज त्यानं पण पाचशेची नोट काडावी?"
असे काहीसे आश्चर्याचे भाव बबन्याच्या चेहऱ्यावर होते, तेव्हाचं पक्यानं दुकानात पाय टाकला.
बबन्याने वासलेला 'आ' त्याने आपल्या डाव्या हाताने हनवटी वर करून मिटवला अन् त्याने आपली टकळी चालू केली.
"काय बबनराव, आज गिराईक जंक्शन दिसतंय."
"अरं गिराईक हाय माइदंळ पण त्याच्या बायला सगळं उसनवारीच हाये कि रं."
"उसनवारी कामून गडे कालच तर विलेक्शन झालेत कि?" पक्या 'अर्थ'पूर्ण नजरेने बबन्याकडे बघून गालात हसत होता.
त्याची नजरच अशी बेरकी होती कि त्याला काय म्हणायचं होतं ते बबन्याला बरोब्बर कळलं. अन् मघाशी पडलेलं कोडं देखील त्या सरशी सुटलं.
"अरं त्याच्या बायला तरीच म्या म्हनलं, कोणीई येतोय हजार, पाचशेचिच नोट काडतोय, ज्याच्या खिशात रुपया सापडायचा नाही ते लोकं आज हजाराची नोट काडतायत. काल विलेक्शन झालेत नायि का?
बबन्या स्वतःशिच बोलल्यासारख बोलला अन् एकदम भानावर येउन तो पक्याला उद्देशून बोलला.
"पकाभाऊ बरं झालं तुमी आलात अन् हे कोडं सुटलं. नायि तर म्या असच बसलो असतो इचार करत. हे घ्या तुमाला गोवाची पुडी आपल्याकडंन, कोडं सोडिवल्याबद्दल." असं म्हणून त्याने एक पुडी पक्याच्या हातावर ठेवली.
कालच विधानसभेचे इलेक्शन झाले होते. शेजारच्या उंबरा गावचेच आमदार साहेब या वेळेस परत उभे होते. नव्याण्णव किलोचे हे आमदार आसपासच्या भागामध्ये बरच 'वजन' राखून होते. आणि तेच निवडून येणार अशी शक्यता नाही तर खात्रीच त्यांच्या कार्यकर्त्यांना होती.
आमदारांनी पण काय कमी खर्च केला नव्हता. कार्यकर्त्यांना गाड्या म्हणू नका, गाडीचा पेट्रोल भत्ता म्हणू नका, रोजचा अलाउन्स म्हणू नका. झालंच तर रात्रीची सोय म्हणून रांजणभरून देशी अन् चकण्याला मीठ आणि फरसाण अशी सगळी व्यवस्था त्यांनी प्रचाराच्या दरम्यान केली होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी इलेक्शनच्या आदल्या दिवशी एका मताला हजार रुपये प्रमाणे जवळ पास एक, सव्वा करोड रुपये वाटल्याची कुजबुज साऱ्या गावानं ऐकली होती.
आमदार साहेबांना पण निवडून येण्याची पक्की खात्रीच होती अन् ते मुंबईला जाण्याच्या तयारीला देखील लागले होते.
 "बरं काये देऊ बोला." बबन्या ने पुढे विचारलं.
"आपल्याला एकाने काय होतंय बबनराव, द्या पन्नासाची माळ" असं म्हणून त्यानं खिशातली हजाराची नोट काढून बबन्या पुढे धरली.
हजाराची नोट बघून प्रथम बबन्याच्या कपाळावर आठी चढली पण लागलीच दोघेही हसत सुटले.
खुळेवाडीत जशी चिल्लरची बोंब होती तशीच काहीशी परिस्थिती आमदार साहेबांच्या कृपेने पंचक्रोशीतील गावामध्ये होती. त्यातून तालुक्याचे गावही सुटले नव्हते.
एक दोन दिवस चिल्लरची वाट 'बघून' तसचं लोकांकडे पैसे असूनही गावावरची आपली उधारी वाढत चाललेली 'न बघवल्यामुळे' तिसऱ्या दिवशी बबन्यानं दुकान भावाच्या हवाली करून, काखेत पिशवी मारून थेट तालुक्याची बँक गाठली.
बँकेतला कॅशीअर ओळखीचाच होता. जायचं अन् पाच एक हजार रुपायची चिल्लर घेऊन यायचं असा साधा 'हिशेब' त्याने मनाशी लावला होता. पण झालं भलतच.
बबन्याने कॅशीअरकडे चिल्लरसाठी विचारून पाच हजार रुपये काउंटरच्यावर आलेल्या हातात दिले अन् तो आपल्या गावातल्या वसुलीचे स्वप्न पहात उभा राहिला.
"काय बबनराव आज अगदी कोऱ्या करकरीत नोटा" कॅशीअरने एक नोट निरखत विचारलं.
"हा खरंय" त्याचं बोलणं बबन्याने हसून साजरं केलं.
"काय ए टी एम मधून काढले काय पैसे?"
"अं …… न्हायी आपलं ते …व्ह्य"
"अच्छा, कुठल्या ए टी एम मधून काढले.?"
बबन्याला काही कळत नव्हतं कि आज कॅशीअर एवढी चौकशी का करतोय? याआधीहि बबन्याने चिल्लर करून नेले होते. ओळख असल्यामुळे काय, यायचं अन् फक्त कशी कशी चिल्लर पाहिजे ते सांगायचं. जर असतील तर देतात. असा त्याचा आज पर्यंतचा अनुभव होता. पण आज हे भलतंच काही तरी होतंय,
या विचारात असतानाच कॅशीअरने परत विचारलं.
"कुठल्या ए टी एम मधून काढले?"
"ए टी एम मदुन न्हाई, यका दोस्तानं दिलते."
"कोणाकडणं भेटले तुम्हाला.?"
"सायेब झालया तरी काय?" बबन्याने अगदी न राहवल्यामुळे शेवटी विचारलंच.
साहेब अजून नोटा निरखून बघतच होता. आता त्याच्या मागे अजून एक दोघं सोबतीलाही होते. अन् त्याच नोटा बघून आपापसात काहीतरी कुजबुजत होते.
"बबनराव ह्या नोटा 'डुप्लीकेट' आहेत" कॅशिअर एक दीर्घ निश्वास टाकून बोलले.
ते ऐकून बबन्याचा चेहरा पांढरा फटक पडला. आता आपल्याला पोलिसात देतील ह्याची भिती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तरीही न उमजून त्याच्या तोंडून शब्द गेलेच.
"म्हंजी?"
"अहो ह्या नोटा 'नकली' आहेत, कोणी तरी खऱ्या म्हणून तुम्हाला दिल्यात." असं म्हणून त्यांनी दोन्ही हात नोटेच्या मधोमध घेऊन ति फाडणार तेवढ्यात बबन्या ओरडला.
"वो सायेब अवो काय करताय?"
"अहो हि नकली नोट आहे. आम्हाला वरून तसे आदेश असतात नकली नोटा फाडून टाकायच्या म्हणून."
"पर अवो माजे पैशे कोन देईल मंग भरून."
"अहो त्यात आम्ही काही करू शकत नाही. बरं थांबा, मला हा शिक्का तर मारावाच लागेल ह्या नोटेवर." असं म्हणून त्यांनी एक लाल शाई असलेला "नकली नोट" असा शिक्का त्या नोटेवर मारला.
"अवो पर मंग ती नोट कोण घ्यायचा न्हाई कि." बबन्या एवढं बोलेपर्यंत तर कॅशीअरने आपलं काम चोख केलं होतं. .
नोटांकडे बघून बबन्या बोलला.
"अवो सायेब आता हि नोट कोन घेईल आमच्याकडून, असा शिक्का मारल्यावर."
"अहो त्या नकली आहेत आणि तुम्ही पण सरकारला मदत करायला पाहिजे अशा नोटा फाडून."  कॅशिअर मान खाली घालून काही तरी लिहीतच बोलला. 
"पर अवो आमचे पैशे बुडले कि ह्याच्यात."
"हे बघा, मी काहीही करू शकत नाही. एक काम करा त्या तिकडे मानसं दिसतायत का कोपऱ्यात? म्यानेजर साहेब येण्याची वाट पाहतायेत तिकडे उभे रहा. त्यांना सांगून सांगून दमलोय आम्ही यात काही करून शकत नाही तुम्हालाहि तेच सांगतोय. ते सगळे 'नकली' वालेच आहेत"
"काय"? बबन्या जोरात ओरडला.
"अहो नाही तर काय फुकटची डोकेदुखी आहे, कालपासून जवळ पास एक लाख रुपयाच्या नकली नोटा बँकेत आल्यात आणि बाकीही बँकेत हीच अवस्था आहे." कॅशीअरने सगळी परिस्थिती सांगितली.
बबन्या त्या उभ्या असलेल्या समदु:खी लोकात ‘मयताला’ आल्यासारखा येउन उभा राहिला. त्यांच्यात त्याला एक दोघे बाजूच्या गावामधले देखील दिसले. पण कोण ओळख दाखवत नव्हते. त्याच्या गावचं मात्र कोण नव्हतं.
"काय तुमची पण नकलीच का?" एकाने बबन्याला "चांगले होते नाही बिचारे?" च्या थाटात विचारलं.
"ह्वो, तुमचे किती व्हते?" बबन्याने उलट प्रश्न केला.
"धा हजार."
"माजे पाच" न विचारताही बबन्याने उत्तर दिलं.
नकलीवाल्यांमध्ये कोणी चिल्लर करायला बँकेत आले होते; कोणी कशा, कशाचे हप्ते भरायला. अन् एखादा बँकेत पैसे ठेवायला.
लवकरच म्यानेजर आले. ते आल्या आल्या जमलेल्या लोकांनी त्यांना घेरलाच. एकच गलका उडाला. जोतो त्यांना विचारू लागला. आमचे पैसे वापस द्या असं म्हणू लागला. नुसता गोंधळ माजला होता. नाही म्हणलं तरी १५, २० लोकं तरी असतील. काही शहाण्या लोकांनी उगा अब्रू चव्हाट्यावर यायची नाहीतर पोलिस पकडून न्यायचे या भितीने गप गुमान काढता पाय घेतला होता; नाही तर संख्या अजून वाढली असती.
म्यानेजर साहेबांचं म्हणणं पडलं कि मी हि गोष्ट वरच्या बँकेला कळवली आहे. त्याव्यतिरिक्त मी काही करू शकत नाही.
लोकं म्यानेजर साहेबांचं ऐकून घ्यायला तयार नव्हते. ते आमचे पैशे परत द्या. नाही तर बदली दुसरे पैसे द्या असही म्हणत होते. नुसता गोंधळ चालू होता. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. बँकेचा सेक्यूरीटी खांद्याला गोळी नसलेली बंदूक अडकावून लोकांना हातानं पाखरं हुसकावल्यासारखं बाहेर काढत होता. पण लोकं काही ऐकत नव्हते. ते त्याच्या डावी, उजवी कडून परत येत होते.
असा सगळा गोंधळ चांगला पंधरा वीस मिनिटे चालू होता. 
एकाएकी पोलिसांची गाडी येउन बँकेबाहेर थांबली. कोणीतरी ओरडलं पोलिस आले, पोलिस आले. एक क्षणभर शांतता पसरली. पण परत गोंधळ सुरु झाला.लोकं पटापट बाहेर येऊ लागले. कोण पोलिसाच्या भितीने पळू लागलं.
कोणी तरी बँकेतूनच पोलिसांना फोन केला होता, असं आल्या आल्या एका हवालदारानेच सांगितलं.
त्याच हवालदाराने (सगळे शांत झाले होते तरीही) एकदा सगळ्यांना शांत रहा असा हात वर करून दम दिला आणि म्यानेजर साहेबांना काय प्रकार झाला ते विचारलं.
म्यानेजरनि सगळी परिस्थिती पोलिसांना सांगितली. पोलिस जेंव्हा जमावाकडे वळले तेंव्हा
त्या जमावात फक्त बबन्या आणि अजून चारच माणसं राहिली होती. बाकीच्या लोकांनी पोलीसांच झंझट नको म्हणून गप गुमान काढता पाय घेतला होता.
त्या प्रमुख हवालदाराने बबन्यालाच विचारलं.
"काय रे, नाव काय तुझं?"
"अ…अ बबन्या, आपलं …बबन."
"किती व्हते पैशे?"
"पाच हजार."
"तुला कोणी दिलते?"
"दोस्तानं दिलते."
"कोण दोस्त, त्याला कोणी दिले?"
"माहित न्हाई"
"दोस्त कोण माहित न्हाई व्हय रे."
"न्हाई … ते आमच्या गावचा टेलर, रम्या"
"काठीकवडे ह्याची जबानी घ्या" असा हुकुम त्यांनी सोबतच्या शिपायाला देऊन ते बाकीच्यांकडे वळले.
बबन्या सोबत इतरांच्या हि जबान्या झाल्या. पोलिस स्टेशन ला जाऊन एफ. आय. आर. देखील दाखल केली गेली अन् बबन्या शिक्के मारलेल्या नोटा घेऊन विचारातच गावाकडे परतला.
बबन्याला कळत नव्हतं कि आपण चांगलं केलं का वाईट केलं? एक मन म्हणत होतं चांगलंच झालं तर त्याला असंही वाटत होती कि आपण असल्या प्रकरणात फसायला नको होतं. आणि पुन्हा आपण रम्याचं नाव घेऊन त्याचा रोष अंगावर ओढून घेतला आहे. आता तोही आपल्याला सोडणार नाही. पण आपल्याकडे इलाजच नव्हता. एकदा आपण पोलीसापुढे दोस्ताचं नाव घेतलं परत आपण जबान बदलली असती तर ते आपल्यालाच जड गेलं असतं. कदाचित मारही पडला असता. पण गावातील एकंदर वातावरण पाहिल्यावर त्याच्या जिवात जिव आला. 
खुळेवाडीत देखील सगळ्यांच्या कानावर 'डुप्लिकेट' नोटांच्या गोष्टी येतंच होत्या. पण खरी मज्या दुसऱ्या दिवशी आली जेंव्हा पेपरात जिल्हा विशेष पानावर ठळक मोठी हेडलाईन आली. 'राजापूर तालुक्यात 'डुप्लिकेट' नोटांचा सूळसुळाट'. बातमी मध्ये खुळेवाडीच्या बबन्याचं देखील इतर चौघांसोबत नाव होतं.
मग काय म्हणता बबन्याचा 'भाव' रातोरात त्याच्या मालापेक्ष्याही वधारला. काल परवा पर्यंत बबन्या म्हणणारे आज बबनराव म्हणू लागले. जोतो यायचा आणि बबन्याला विचारायचा.
"काय राव कसं कसं झालं सांगा कि जरा?"
मग काय बबन्याची कळी खुलायची आणि सगळी हकीकत मीठ, मिरचू, कांदा, तेल, हळद जे (दुकानात) आहे नाही ते लाऊन सांगायचा.
काही दिवस बबन्याला त्याच्या 'माला' सकट भरपूर डिमांड आली होती. पण बबन्याची उधारी मात्र वाढत होती.
एखादा यायचा आणि त्याच्याकडून असली, 'नकली' किस्से ऐकून त्याला जरा गोड बोलून उधारी वाढवायचा. बबन्याने पैशाचं विचारलंच तर हजाराची नोट पुढे करायचा. बबन्या कसला हजाराच्या नोटेला हात लावतोय. त्यानं हजार अन् पाचशेची धास्तीच घेतली होती. आणि याचा फायदा गाववाले घेत होते.
बघता बघता दिवस जात होते आणि बबन्याची 'उधारी' वाढत होती.
खुळेवाडीत हे हाल होते तसेच काहीसे इतरही गावामध्ये होते, आमदारसाहेबांच्या संपूर्ण तालुक्यात 'डुप्लिकेट'चाच बोलबाला होता.
तालुक्यात आणि इतरही गावांमध्ये कोणीही हजार, पाचशेची नवीन नोट घेत नव्हते, काय सांगावं 'डुप्लिकेट' असेल तर!
'नव्या नवरीचे नऊ दिवस' संपले आणि बबन्याला कोण विचारीणा झालं. काही 'हितचिंतक' त्याच्या 'चिंता' वाढवु लागले.
"कशाला ह्या फंदात पडलास बाबा, पोलिसांचा नाद करु नये शान्या माणसानं"
"मोट्या माणसांचा हात असतोय असल्या प्रकरणात आपण उगी साक्षी, बिक्षी देत फिरू नये, उगा पुना आपल्याच अंगलट येतंय." अशी बोलणी बबन्याच्या कानी पडू लागली.
तो आता चांगलाच वैतागला होता. कारण उधारी वसूल होत नव्हती आणि माल भरायला जवळचे पैसेहि संपले होते आणि त्यात आता लोकं मनात काही, बाही भरवू लागले होते.
आणि अशातच एके दिवशी सकाळी सकाळी दोन शिपाई आणि एक हवालदार भरून आलेली जीप मारुतीच्या देवळासमोर थांबली. उतरल्याबरोबर त्यांनी बबन्याचं घर विचारलं. एका पोरानं ते आपलं 'कर्तव्य' मानून चोख काम केलं आणि बबन्या समोर आणून सगळ्यांना उभं केलं.
हातातली फायबरची काठी गोल फिरवत त्याच प्रमुख हवालदाराने विचारलं.
"बबन खूळवाडकर तूच का रे?"
पोलिसांना समोर बघून बबन्याची बोबडीच वळली. क्षणभर त्याला काहीच कळलं नाही.
"अ…… हवो" बबन्या अडखळत कसं तरी बोलला.
"तुला त्या डुप्लीकेट नोटा कोणी देलत्या म्हणला?" हवालदाराच्या आवाजात जरब होती.
"टेलर न, रम्या नावयं त्यचं." बबन्या परत अडखळत बोलला.
 "चल, घर दाखव त्यचं." अस म्हणून त्यांनी बबन्याला दुकानाच्या बाहेर काढला.
"बायला, काहीच मेळ लागणा झालाय कुटनं आल्या एवढ्या नोटा ते, चार लोकांच्या चौकशा करून झाल्या पण अजून काही धागे दोरे जुळणा झालेत." बबन्या बाहेर आल्यावर त्याला उद्देशून हवालदार बोलला.
आतापर्यंत गावात पोलिस आल्याची बातमी कळलीच होती. देवळासमोर अर्ध गाव जमा झालं.
लोकांमध्ये कुजबुज चालूच होती. कोण म्हणत होतं, "आता बबन्याला पकडून नेतेत" तर कोणी "अरं नुसती चौकशी हाये हि" असं बोलत होते. तर कोणी सरळ पोलिसांनाच विचारण्याचं धाडस करत होते.
पोलिस बबन्याला घेऊन रम्याच्या घराकडे निघाले तसं काही मानसं, पोरं, ठोरांचीहि वरात त्यांच्या मागुन निघाली.
घर जवळ आलं. हवालदाराने बबन्याला दार वाजवण्याची खून केली त्याप्रमाणे बबन्याने दार वाजवलं.
दार रम्यानंच उघडलं.
रम्या दिसल्या दिसल्या बबन्या ने नाव उच्चारण्याच्या आधीच हवालदाराने रम्याला धरला.
"डुप्लीकेट नोटा छापतो व्ह्य रे?" असं म्हणून एक कानाखाली ठेऊन दिली आणि मग विचारलं
"मशिन कुठाय सांग?"
"कोणच्या नोटा सायेब, कसली मशीन?"
"ज्या नोटा तू ह्याला दिलत्यास." बबन्या कडे बोट करून हवालदार बोलला. 
"सायेब त्या नोटा म्या, ए टी एम मदनं काडल्या व्हत्या"
"खरं सांग इथच सगळं, स्टेशनला गेल्यावर लई महाग पडल" गचांडी धरून हवालदार ओरडला.
"खरंच सांगतूय वो, म्या न्हाई छापल्या."
"मग कोणी छापल्या?"
"मला काय म्हाइति"
"काठीकवडे ह्याला घेऊन चला आपल्या सोबत, हा असा न्हाई ऐकायचा" असं म्हणून हवालदाराने वरात आल्या पावली परत जीपपर्यंत चालवली. पोलिसांनी रम्याच्या मुसक्या बांधल्या होत्या अन् त्याला पुढं पुढं ढकलत नेत होते. बबन्या मोकळाच होता. 
हवालदाराचा चेहरा उजळलेला होता. काहीतरी पुरावा हाती लागला आहे हे हवालदाराचा चेहराच सांगत होता.
पोलिसांची जीप आल्यामार्गाने धुरोळा उडवत परत गेली. फक्त दोन लोकं जास्त घेऊन गेली. बबन्या आणि रम्या.
रम्या पेशाने टेलर पण गुंड प्रवृतीचा होता, गावातील भांडणात त्याचा सक्रिय सहभाग असायचा. एकाच्या डोक्यात काठी घातल्यामुळे तो आठ दिवस पोलिस कोठडीतहि जाऊन आला होता. भावकीच्या भांडणात तो नेहमी पुढं असायचा. रम्याच्या ओळखीहि जबर होत्या. आमदार, खासदार लोकांपर्यंत रम्याची ओळख होती तसंच सराईत गुंड, घरफोडेहि त्याला ओळखत. त्यामुळे गावातील लोक त्याच्याशी वैर नकोच म्हणायचे. नोटा छापण्यात याचा हात असू शकतो अशी शंका हवालदाराला येणं, हे साहजिकच होतं.
खरं तर रम्या घरी नाही हे बबन्याला माहित होतं. कारण बबन्या त्याच्या घरी एक,दोन वेळेस आला होता त्याला हेच सांगायचं होतं कि, मी तुझं नाव पोलिसांना अनावधानाने सांगितलय त्यामुळे तू कुठे तरी पळून जा. पण रम्या भेटला नव्हता. रम्याच्या बायकोने ते गावाला गेलेत सांगितलं होतं. पण आज रम्याला घरी बघून बबन्यालाहि आश्चर्य वाटलं होतं. काल रात्रीच रम्या गावाहून परतला होता.
रम्याला पोलिसांनी धरला हि खबर हाहा म्हणता आसपासच्या गावात पोचली. इकडे आमदारांच्या गोटातहि पोचली अन् आमदार आणि त्यांचा उजवा हात असलेला बाबू यांची पाचावर धारण बसली.
रम्या आणि बाबू जानी दोस्त. दोघांनी बरीच चांगली, वाईट कामे सोबत केली होती. आणि बाबू मुळेच रम्याच्या ओळखी वाढल्या होत्या.
रम्याला पकडला हे समजल्यापासून आमदाराच्या पोटात मळमळायला लागलं होतं. सगळं रम्याच्या 'पोटातच' राहतंय का रम्या 'ओकतोय' ह्याचीच चिंता त्यांना लागून राहिली होती. तसं तर त्यांची तब्येत नकली नोटा पकडल्यापासूनच बरी नव्हती. आणि आज कधीनव्हे ते बाबुवर चिडले होते.
"तुला सांगत व्हतो हे असले धंदे नको मनुन, पण आमचं येकायचंच न्हाई नं" अंगणात येरझाऱ्या घालत ते बाबुवर उखडले.
"पण दादा, तुम्हीच तर म्हणले व्हते, इलेक्शनला पैशे न्हायीत मनुन; कुटून पण आना"
"हो, पण माजं मननं आपलं नेहमी परमानं कोणाला तरी धरायचा, काही तरी मंजूर करून पैशे उकळायचे"
"अवो त्यो बुवा मनला कि, कोणाला काईबी कळणार न्हाई, तुमी बिंदास वाट्टेल तेवढे घाणे काढा"
"अवो, घाणे काडायला ते काय जिलबी, भजे हेत का? ते मनला अन् तुमी ऐकलं. तुमी थांबलेबी कवा तर कागद संपल्यावर; शब्बास रे पठ्ठे".
"आता मंग तसला कागुदच कुटं भेटणा झाल्यावर कसं करणार?" बाबू निरागसपणे बोलला.
"लई शाना हाईस; ते मरुद्या जरा आता रम्या कडं ध्यान द्या, ते काहीबी वकायला नायि पाईजेल अन् त्याला काहीपण करून भायेर काडा. " एवढं बोलून आमदार परत येरझाऱ्या घालू लागले.
आमदाराचा निरोप घेऊन बाबू रम्याला बाहेर काढण्याच्या खटपटीला लागला.
रम्याला घेऊन पोलिस स्टेशनला आले आणि आल्याआल्या त्यांनी धुलाई सुरु केली. पण रम्या पण काही कच्या गुरूचा चेला नव्हता. तो पण बारा गावचं पाणी प्यालेला होता. तो पोलिसांना ताकास तूर लागू देईना. तो एवढंच म्हणायचा कि "म्या ए टी एम मदनं काडले". रम्या ला ठाऊक होतं कि बाबू काहीही करून आपल्याला बाहेर काढणार, फक्त अजून थोडी कळ सोसावी लागल.
पण रम्या आणि बाबूचं नशीब तेवढं जोरावर नव्हतं जेवढं पोलिसांचं होतं. दुसऱ्याच दिवशी रम्याला थर्ड डिग्री लावल्यावर काही टिकाव धरता आला नाही. आणि सगळं उलटून तो मोकळा झाला.
रम्यानं जबानी दिल्यावर पोलिसांनी पटापट सूत्र हलवली अन् बाबूच्या नावाने अटक वारंट निघालं. पण बाबूला हि खबर लागताच तो परागंदा झाला होता. आणि पोलिसांना सापडण्याचं नाव घेत नव्हता.
खरे गुन्हेगार सगळ्यांच्या नजरेसमोर आले होते. अन् गावकरी बाबू आणि आमदाराला (डुप्लीकेट नोटा दिल्या म्हणून) शिव्या घालत होते. एक गोष्ट मात्र खरी होती कि गावात बबन्याचा भाव त्याच्या मालासकट वाढला होता. जो तो बबन्याचं कौतुक करू लागला. बबन्यामुळंच सगळे पकडले गेले म्हणू लागला. पण त्याच्या मनात काही वेगळंच होतं. बबन्या आतून भेदरला होता त्याला माहित होतं, बाबू काही आपल्याला सोडणार न्हाई आणि गावात जर आपल्या नावाची अशीच चर्चा चालू राहिली तर तो अजूनच भडकेल. त्यामुळे बबन्याने हवापालट म्हणून गावातून पोबारा केला.
एक दोन दिवस गेले, गावातील बबन्याची चर्चापण आता बऱ्यापैक्की कमी झाली होती. लोकं आता निकालाचीच चर्चा करत होते. आणि तालुक्याचचं काय तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष्य 'राजापूर विधानसभेवरच होतं. 'डुप्लीकेट' वाले जुणे आमदारच येणार का लोकांना सत्तापालट पाहिजे ह्याचा निकाल दोन दिवसावरच येउन ठेपला होता. अन् निकालाच्या आदल्या दिवशीच पोलिसांनी बाबुला मुद्देमालासकट धरला अशी बातमी पेपरला आली.
बाबू नोटा छापायची मशीन समुद्रात टाकून द्यायला मुंबईला चालला होता. वाटेतच पोलिसांनी धरला.
ती मशीनही इम्पोर्टेड होती आणि बाबूने एका अमेरिकन माणसाकडून ती घेऊन तब्बल दोन करोड चाळीस लाख रुपये आत्तापर्यंत छापले होते. आणि त्यातले बरेचसे इलेक्शनच्या कामामध्ये 'वाटले' होते.
निकाल लागून आठ दिवस झाले. तसं बबन्या आपल्या गावाकडे निघाला, आत्तापर्यंत सगळं स्थिरस्तावर झालं असेल असा अंदाज त्याने बांधला होता. वेशीवरच त्याला सुताराचा पक्या भेटला. 
"काय पक्या कुणिकडं?" बबन्याने त्याला विचारलं. 
"म्या व्हय, चाललोय राजापूरला अन् शाना असशील तर तू पण चल."
"का रं, असं का म्हनतुयास?" बबन्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. 
"अरं ते बाब्या जामिनावर सुटलंय आणि पोलिसात केस करणाऱ्याच्या मागं हाये."
बबन्या काय समजायचं ते समजला आणि आपल्या गावची वाट चालू लागला. 
खरं होतं, बाबू सुटला होता कारण जुने आमदारच परत निवडून आले होते. अखेर विजय 'डुप्लीकेट' लोकशाहीचाच झाला होता. 

Monday 30 May 2016

महापुरुषांच्या जयंती निमित्त सोरा गावाने घालून दिला नवा आदर्श.(महापुरुषांची एकत्र जयंती)

सध्या दुष्काळावर बरीच चर्चा चालू आहे आणि सगळीकडेच त्याच्या उपाययोजनांवर चर्चा आणि कामे सुद्धा चालू आहेत. असंच एक काम हाती घेतलं होतं सोरा (ता. अहमदपूर, जि. लातूर) गावातील तरुणांनी. ह्या कामाचं  विशेष म्हणजे निमित्त होतं ते महापुरुषांच्या जयंतीचं. गावातील तरुणांनी महाराणा प्रताप सिंह, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांच्या जयंती वेगवेगळ्या साजऱ्या न करता एकत्र साजऱ्या करायचा संकल्प  केला होता. तो या वर्षी त्यांनी पूर्णत्वास नेला आणि दिनांक २४ मे रोजी एकत्रित जयंती साजरी झाली.

जयंती निमित्त केवळ वैचारिक देवाण घेवाण करून चालणार नाही हे ओळखून एक पाऊल पुढे टाकून या एकत्रित जयंती निमित्त गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी, ग्राम स्वराज फाउंडेशन, परभणी आणि ओंजळ प्रतिष्ठान, पुणे यांच्या मदतीने गावाजवळील ओढा खोलीकरण करण्याचे काम हाती घेतले आणि तडीस नेले.

ग्राम स्वराज फाउंडेशन आणि ओंजळ प्रतिष्ठान यांनी मदत करण्याची तयारी दाखवली होती पण त्यांची अट होती कि गावातूनही निधी जमा व्हायला पाहिजे.  हे काम करायचं म्हटल्यावर विरोध होणार हे सगळे ओळखूनच होते. एक तर सततची नापिकी, पाण्याची बोंब त्यात अजून एक दुखणं वाढवून घायचं बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात नव्हतं. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांकडून एकही पैसा न घेता मागच्या वर्ष्याच्या जयंतीच्या वर्गणीतले पैसे वापरायचे ठरवले आणि गावातील नौकरदार वर्गाकडून ठराविक रक्कम प्रत्येकी उभा केली गेली. पण अजूनही सर्व शेतकरी ऐकत नव्हतेच त्यांना भीती होती कि आपण हो म्हणल्यावर पैसे द्यावे लागतील कि काय?
मग मार्ग काढला गेला कि ज्यांची तयारी आहे त्यांच्याच रानाशेजारच्या ओढ्यात काम करायचं आणि कामाला सुरुवात झाली.

काम बघून जवळपास सगळ्यांचा विरोध मावळला पण एका म्हातारीचा विरोध अजूनही होताच. तिला कोणी सांगायला गेलं कि त्यालाच शिव्या द्यायची आणि काहीबाही बोलायची. "माझी एक्करभर जमीन आणि त्यात   खंदल्यावर मला काय राहील? " म्हणायची. तिला हर तऱ्हेने समजावून सांगितले तरीही ऐकेना तेंव्हा तिचा नाद सगळ्यांनी सोडला.
अर्धा किलोमीटर काम झाल्यावर त्या म्हातारीचं रान लागलं आणि पुन्हा एकदा प्रयत्न करू म्हणून चार जन पहाटे पाचलाच तिच्या दारी येउन बसले. आणि या वेळेला मात्र नाही, हो करत बाईनं मंजुरी दिली.
तिच्या रानात काम सुरु झालं, म्हातारी काम बघायला आली आणि काम बघून घरी जाऊन सगळ्यांसाठी चहा पाठवला व दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तयारी देखील दर्शवली.

ऑपरेटर लोकांची चांगली बडदास्त ठेऊन तरुणांनी तीन दिवसात जवळ पास एक किलोमीटर काम अपेक्षेपेक्ष्या अर्ध्या निधी मध्ये करून घेतले.
आता येत्या जुन महिन्यात गावातील पाचवी पर्यंतच्या शाळेमध्ये ई लर्निंग करायचा गावातील तरुणांचा निर्धार आहे.
जाती पाती मध्ये गुरफटलेले आजचं राजकारण आणि तरुण पाहता या गावाने एक नवीन पायवाट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. सध्याच्या समाजाला या वाटेवरून चालण्याची खरी गरज आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.








Monday 30 December 2013

उळळागड्डी , एक अप्रतिम एकांकिका


नुकतच पुरोषोत्तम करंडक आणि इतर राज्य स्पर्धेत ह्या वर्षी अव्वल ठरलेली एकांकिका 'उळळागड्डी' पाहण्याचा योग आला. बरेचसे प्रेक्षक विचारत होते "उळळागड्डी म्हणजे काय हो?". कोणी विचारत होतं , " काय हो विनोदी आहे का एकांकिका?". पण आम्हीहि केवळ पुरोषोत्तम करंडक  विजेती आणि उत्सुकता यापोटीच आलो होतो, यापलीकडे काहीच माहित नव्हतं.
एकांकिका खरं तर दिलेल्या वेळेपेक्ष्या बऱ्याच उशिराने सुरु झाली त्यामुळे प्रेक्षक खूप वैतागले होते. त्या नाराजी मुळे प्रेक्षकांनी विनाकारण टाळ्या वाजऊन संयोजकांना हैराण करून सोडलं होतं. उठून निघून घरी येण्याचे विचारहि मनामध्ये येत होते (विनामूल्य असल्यामुळे). आणि बरेचसे लोक निघून गेलेही . पण तसं केलं नाही हे चांगलंच झालं असं एकांकिका बघून नक्कीच वाटलं.
पुरोषोत्तम करंडक म्हटले कि तरुणाई आणि दंगा हा असणारच हे समीकरण माहितच होतं. एकांकिका सुरू झाली , पाहिलं एक दृश्य थोडसं गोंगाटातच गेलं. पण नंतर जेंव्हा साउंड वगैरे चांगला झाला आणि जसं ते पूरांच
दृश्य समोर आलं तसं सगळं पब्लिक एकदम हाताची घडी तोंडावर बोट ह्या स्टेज ला आलं आणि एकदम पिन ड्रोप सायलेन्स झाला. सगळे थक्क होऊन पुढंच दृश्य बघत होते. पुरामध्ये अडकल्यामुळे एक मुलगी आणि
तिचा काका शोभेल असा एक इसम, एका झाडावर  जगण्यासाठी धडपडतयात. खाली जोराचा प्रवाह आहे, विजा चमकतायत , ढगांचा गडगडाट आहे. केवळ अप्रतिम असं दृश्य. आणि कोण तरी एक रसिक प्रेक्षक भानावर येऊन टाळी वाजवतो आणि पूर्ण थेटर त्याचं अनुकरण करतं. नेपथ्य खूप आवडल्याची ती खुणच म्हणावी लागेल.
तर सुरुवात तर तुम्हाला कळलीच आहे. पूर्ण एकांकिका अशींच न सांगता. तुम्हाला फक्त मला जे आवडले ते सांगतो.
गोष्ट आहे दोन व्यक्तींवर एक १५,१६ वर्षांची मुलगी आणि तिचा काका शोभेल असा इसम हे एका पुरामध्ये एका झाडावर अडकतात. तो इसम आहे मराठी आणि ती मुलगी कानडी त्यामुळे दोघांचंहि बोललेलं एकमेकांना प्रथम काही कळत नाही. पण ज्या काही सहजतेने दिग्दर्शक त्यांना हाताळतो आणि अगदी साध्या संवादाने त्यांचं संभाषण जस पुढे जातं तसं त्या दोघांना एकमेकांच्या भाषेचे काही शब्द कळायला लागतात. हे इतक्या जलद घडत तरीही आपल्याला त्याबद्दल आक्षेप  राहत नाही. उलट आपण ह्या भाषा गोंधळामुळे अजूनच हुरुप येऊन पाहतो. आणि त्यात चांगली विनोदाची पेरणी करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
अजून एक आवर्जून सांगावा असा प्रसंग म्हणजे त्या मुलीला भूक लागलेली असते आणि तो इसम पाण्यामध्ये अडकलेल्या काट्या, कुपाटयात काही तरी खायला मिळतय का? हे शोधत असताना एका तरुणीचा मृतदेह वर येतो तो क्षण नक्कीच आपल्याला घाबरवून सोडतो.
काही खायला मिळतंय का? हे शोधतांना त्या इसमाला खराब झालेला, कोंब वगैरे फुटलेला 'उळळागड्डी' सापडतो. पण तरीही तो तसाच आपल्या खिश्यात ठेवतो.
ती दोघं एक रात्र त्याच झाडावर काढतात. तोपर्यंत त्या दोघांचेही खूप हाल झालेले असतात. दुसऱ्या दिवशी मुलीला ताप वगैरे आला असल्यामुळे ती तो 'उळळागड्डी' खायला मागते.
नंतर सुदैवाने त्या दोघांची सुटका एक हेलीकॉप्टर करतं आणि ती दोघं सुखरूप सुटतात तोपर्यंत त्या दोघांचं एक अनामिक नातं तयार झालेलं असतं कि तो इसम तिला आपल्या घरी येण्यास विचारतो. पण शेवटी काय होतं हे मी इथे सांगत नाही. ते तुम्ही जाऊन बघावं हेच उचित. आणि हो शेवट हि छानच केला आहे.
म्हटलं तर एकांकिकेला दिलेलं नाव 'उळळागड्डी' योग्य वाटतं म्हटलं तर त्यात तसा काही अर्थही नाही. तरी पण नक्कीच आपल्या मनात 'उळळागड्डी' बद्दल एक वेगळीच आपुलकीची भावना तयार होते आणि दिलेल नाव योग्यच वाटतं.
दोघांचा हि अभिनय अप्रतिम आहे. भाषा भेदामुळे होणारे विनोद हसवतात. आणि सर्वात जमेची बाजू म्हणजे एकांकिकेचे नेपथ्य आणि प्रकाश योजना. पाण्याचा प्रवाह , अडकलेले काटे वगैरे त्यांनी फार छान उभं केलंय. (फक्त ह्याच्यासाठी एकदा तरी पहावी) ह्या दोन्हीतही त्यांना आपण पैकी च्या पैक्की मार्क देऊन टाकतो, आणि एक सुंदर, अप्रतिम असा अनुभव घेऊन विचार करतच थेटरच्या बाहेर पडतो.

(वरील प्रयत्नाला परीक्षण समजू नये. हे लिखाण केवळ ज्या लोकांना एकांकिकेबद्दल  माहित नाही आणि जे बघण्यास इच्छुक आहेत त्यांच्या साठी ओळख म्हणून लिहिलंय. आणि काही उणे असेल तर ते लिखाणाचा दोष समजावा. कारण एकांकिका फारच सुंदर आहे आणि कदाचित मला ती सांगताना झेपली नसल्याची शक्यताहि नाकारता येत नाही. )

 

Tuesday 26 November 2013

'आधारा' ची रात्र

"उद्याच्याला आपल्या गावात आंधाराची रात हाये हो... ओ ओ ओ..."
"तरी समद्यांनी उद्या सांच्याला ७ वाज्त्ता चावडीवर हजर राहंच हाये हो ...ओ ओ ओ..."
"येताना समद्यांनी विलेक्शन कारड आनाचं हाये हो.... ओ ओ ओ..."
म्हादूनं हलगी वाजवत दवंडी द्यायला सुरुवात केली तसं चावडी जवळ खेळणारी पोरं सगळी खेळ थांबवून एकमेकाकडे बघून हसायला लागली. त्याचं कारण हि तसच होतं, त्यांनी त्यांच्या उभ्या जन्मात दवंडी कधी ऐकली नव्हती. जवळ जवळ सगळ्याच पोरांना हि गोष्ट नवीन होती.
म्हादू जसा चावडीकडून पुढ निघाला तसं सगळे पोरं एखादी नं बघितलेली गाडी गावात आल्यावर कसं मागे जातात. तसं त्याच्या मागे जायला लागली. तर इकडे चावडी वर बसलेल्यांना चरायला नवीन कुरण मिळालं.
"हि आणि कोणची रात मनायची?" गुरव आप्पानि मांडी घालून अवघडलेले पाय लांब करत पहिलं पिल्लू सोडलं.
"कोंच कि गीऱ्हान हाय कि मनं, त्यची रात आसल" ढमालेच्या बाबुदानं आपलं ज्ञान पाजळलं.
" पर म्या मनतो गीऱ्हानाला विलेक्शन कारड कश्यापाई फाहीजे" गणूतात्यानं रास्त शंका उपस्थित केली तशी बसलेली सगळी मंडळी हसायला लागली.
"आरं ती ग्रहणाची रात् नाही रं, ते आधार कार्ड काडन्यासाठी लोकं येणारायात, त्यची दवंडी हाय" आपल्या डोक्यावरच्या टोपिनं कपाळावरचा घाम पुसून मोठे आप्पा बोलले.
मोठे आप्पा म्हणजे चार बुकं शिकलेला माणूस होता. वरिष्ठ मंडळींच्यात त्यांची वट होती. सगळे गावकरी त्याचं ऐकायचे त्यांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट खोटी असूच शकत नाही असा सगळ्यांचा समज असायचा. तशी ती आजहि खरीच होती. गावामध्ये आधार कार्ड काढण्यासाठी लोकं येणार होते. आणि त्याचीच दवंडी देत म्हादू गावातनं फिरत होता.
" पण हे दवंडीच नवीनच बघतूय कि" मोठ्या आप्पानि शंका उपस्थित केली.
" सरपंचानच सांगितलंय दवंडी द्यायला, हलगी नीट करून घेतलेत. इतून फुड आता गावात हलगी वाजणार बगा, अन म्हाद्याला काई काम नसतंय म्हणून दिलंय आपलं कामाला लाऊन ."
तंबाकुची थुंकी तोंडात सावरत वरच्या आळीचे नाना बोलले अन बोलून झाल्यावर त्यांनी एक लांब पिंक टाकली. नानांची हि खासियतच होती तोंडात तंबाकू असतानाच फक्त ते बोलायचे. पिंक बाहेर टाकली कि गप गुमान बसायचे. त्यांच्या ह्या सवयीला ओळखून नानांनी पिंक टाकली तसं बाबुदा बोलले.
"आरं पर हे येडं आंधाराची रात , आंधाराची रात करत फिरतंया कि. मी मनतो लोकायला कसं कळणार कश्याची रात हाये ते.?"
" मंग आणि काय, लोकं तर म्हण्तील रोजचं आंधार असतुया कि रातच्याला, उद्याच्याला काय नवीन हाय मंग" मोठ्या आप्पांची शंका रास्त होती.
म्हादू गावातनं फिरत होता अन गल्ली गल्ली मध्ये पोरं सोरं , गडी माणसं, बायका त्याला भंडावून सोडत होत्या कि "बाबा रोजच तर अंधार असतोय कि रात्री. मग उद्या आनी काय विशेष".
पण लोकांच्या या प्रश्नावर म्हादूकडे उत्तर नव्हतं. तो आपला प्रत्येक गावात जसा "सांग काम्या हो नाम्या" माणूस असतो, तसाच होता. 
पण दुसऱ्या वेळेला मात्र म्हादूने दवंडी देण्याच्या अगोदर गावात नेमकं काय येणार आहे हे सरपंचाकडून नीट समजून घेतलं आणि चोख काम केलं. आता गावातल्या सर्व लोकांना कळालं होतं कि गावात आधार कार्ड येणार म्हणून.

गावात सकाळ संध्याकाळ दोन वेळा दवंडी देऊन झाली. आधार कार्ड येणार म्हणल्यावर त्याची चर्चा झाल्याशिवाय थोडीच राहतेय. प्रत्येक घरा घरात त्या रात्री एकच चर्चा होती ती म्हणजे आधार कार्ड.
 
" म्या नायी यणार बाई ते आदार का फिदार कारड काडायला." बायजाक्का अंगणात बसलेल्या आपल्या लेकाला उद्देशून म्हणाली.
" कामून ते."
"ती शिन्द्यायची संगी मनत व्हती ते काई बाई डोल्यात घालत्यात मनं अन हातालाबी काय्की लावत्यात, त्यनं कोनचा कि रोग व्हतया मनं."
"कायी रोग अन फिग व्हत नस्तया, ती संगी एक सांगणार अन तू ऐकणार".
"हामच्या बुढयायच्या अरद्या गवऱ्या मस्नात गेल्यावर काय काडलया या सरकारनं बी"  बायजाक्का लेकाला उद्देशून म्हणाली खरी पण लेक काही ऐकून घायच्या मनस्थितीत नव्हता. तेव्हा तिनं आपलं आपलंच बडबडनं चालू ठेवलं.
 
घरा घरात थोड्या बहुत फरकाने हीच अवस्था होती. कोणी उत्सुक होतं तर कोणी भीत होतं. ज्या काही थोड्या फार मंडळीना माहित होतं, त्यांना निदान आजच्या पुरती तरी गावात मागणी होती.  ती सगळ्यांना समजावून सांगत होती कि हे नेमकं काय आहे आणि ह्याचं काम कुठे पडतंय ते.
 
बघता बघता दिवस सरला अन दुसरा दिवस उजाडला. दिवस कासराभर वर आला तसं उपसरपंच सुदाम भाऊंनी कार्यकर्त्यांची मीटिंग बोलावली. मीटिंग मधल्या प्रत्येकाला वाटत होतं कि आधार कार्डा बद्दल काही असेल पण प्रकरण थोडं वेगळ होतं.
उपसरपंचान्नी त्यांच्या खास शैलीत म्हणजे प्रत्येक वाक्याच्या शेवटच्या शब्दावर जोर देत, लांब हेल काढत सुरुवात केली.
"मंडळी आज आपल्या गावामंदी, आपल्या पार्टीचे जिल्ल्याचे अध्यक्ष बंडू दादा काठीकवडे यणार हायेत. अनि त्यायला खुश ठेवाची वरूनच आडर हाये. त्यामुळं रातच्याला कोंबडी, बिम्बडीचा बेत हाये. तर आपल्या कार्यकर्त्यांयनी कुट उंडारायचं नायि, समदा कार्यकरम नीट झाला पाहिजेल, नायी तर पुडच्या येळेला तिकीट मिळणार नायी अशी आडर हाये." 
भाऊंचं भाषण संपलं तसं सगळया कार्यकर्त्यांचे डोळे बघण्यासारखे झाले होते. प्रत्येक जन हर्ष उल्हासाने न्हाऊन गेला होता.
त्यांना माहित होतं कि हे काठीकवडे  आणि त्यांची मंडळी म्हणजे फुल पेताड. दर वेळी प्रमाणे पिऊन नुसता दंगा घालणार.  म्हणजे जे काही कोंबडी वगैरे संपवायचं काम आहे ते त्यांच्यावरच येऊन पडेल. ह्या विचारांनी त्यांच्या पोटात गुदगुल्या होत होत्या.
"भाऊ ते समंद हामि करू वो, पर आज ते आधार कारड वाले पण यणार हायेत मनं त्यायचाबी जरा बंदोबस्त करायला पाहिजेल असं आन्ना मनत व्हते." आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपवत पक्यानं आपली शंका बोलून दाखवली तसे भाऊ उचकले.
" त्यायला काय घरं दारं न्हाईत व्ह्य रं, मोटा आलाय आदार वाल्यायचा कैवारी."
"पर आन्ना मनत व्हते कि ते आपल्याला सोय व्हावी मनून रातच्याला यणार हायेत, दिसभर गावात कोण नसतंय समदे आपआपल्या रानायमंदी असत्यात तवा त्यायनीच मनले मनं कि आमी रातच्याला यतो मनून, तवा आपल्यालाबी त्यायची सोय बगावी लागल." पक्क्याने आन्नांचा विचार मांडला.
"ह..वो बाबू त्यायच्यातलाच एक बग अन घे जावई करून" भाऊ आता भलतेच गरम झाले होते.
भाऊंचा राग बघून पक्या आणि मंडळी गप गुमान भाऊंचा निरोप घेऊन तिथून सटकले.
कामं खूप होती अन वेळ थोडा. मी कंट्री, तू फॉरेन आणि तो कोंबडी असं  विभाजन करून मंडळीनि आपापसात कामं वाटून घेतली, अन कामाला लागली.
खरं तर आधार वाल्यांसोबत भाऊंची काय दुष्मनी नव्हती. पण आन्ना म्हणाले म्हणून त्यांना उलट जायचंच , हा भाऊंचा शिरस्ता होता. भाऊंना मागे पाडून आन्ना सरपंच झाले होते हा राग त्यांच्या मनात अजून खदखदत होता, म्हणून आन्नांच्या गैरहजेरीत भाऊ सरपंच आन्नाच्या वर राग राग करत.
 
हा हा म्हणता म्हणता संध्याकाळ झाली. अन एकदाचे दोन मोटरसायकल वर चार जण आधार कार्डच्या किटा घेऊन गावात हजर झाले. त्यांच्या अवतारावरूनच वाटत होतं कि मंडळी खूप लांबच्या पल्ल्यावरून आली आहे. कपड्या, केसांवर नुसती धूळ साचली होती, प्रत्येकजण प्रवासाने शिणलेला दिसत होता.
गावात आल्या आल्या त्यांच्यातल्या एकाने गाडी थांबवून एका माणसाला सरपंचाच घर विचारलं.
त्या बहादरानं पण सरपंचाच घर नं सांगता त्यांची व्यवस्था चावडीमागच्या शामियान्यात केल्याच सांगितलं. तसं सगळे तिकडेच निघाले.
कार्यकर्त्यानी बंडू दादा येणार म्हणून सगळी जय्यत तयारी केली होती. एक छोटासा शामियाना बरोब्बर चावडीच्या मागच्या बाजूला उभारला होता. त्याला चारही बाजूंनी कोणाला दिसू नये म्हणून पडदे वगैरे लावले होते. सहसा तिकडे कोण गावकरी जात नसत आणि रात्री तर काळ कुत्र पण फिरकत नसे. अंगणवाडीची खोली चावडीला लागुनच पण चावडीच्या विरुद्ध दिशेला होती. तिच्यात सगळ्या गाद्यालोड वगैंरे ची जय्यत तयारी होती.  शामियाना आणि बाकीची व्यवस्था बघून आधार वाल्यांचा साहेबतर जाम खुश झाला. पण हि खुशी जास्त वेळ त्याच्या चेहऱ्यावर टिकली नाही.
कारण उपसरपंचाचं तेवढ्यात आगमन झालं होतं आणि आल्याआल्या त्यांनी विचारलं.
"काय मंडळी कस काय वाट चुकला आमच्या गावाकड?"
"आम्ही आधार कार्ड वाले आहोत, आपण कोण?" साहेबांनी सभ्य भाषेत विचारलं.
"हामि व्हय, म्या उपसरपंच हाय गावचासुदाम भाऊ म्हणत्यात मला"  उपसरपंच जरा गुर्मीतच बोलले.
" रात्री सगळे गावकरी इथेच जमणार असं दिसतंय." साहेब शामियान्याकडे हात दाखवत एवढं बोलणार कि लगेच सुदाम भाऊ त्याला आडवत बोलले.
"काय, यड का खुळ तुम्ही आं, ते जिल्ल्याचे पुढारी येणारेत त्यायच्यासाठी केलंय हे समदं."
"ओ तुम्ही जरा नीट बोला, कोणाला बोलताय माहित आहे का?"
वेडा म्हटल्यामुळे साहेब जरा दुखावल्याच गेले होते.
"ठीकाय ठीकाय, तुमची यवस्था तिकडं केली असल बघा चावडीकड" सुदाम भाऊ अजून तेठच होते.
भाऊ एवढं बोलणार तेवढ्यात पक्क्या तिथं येऊन हजर झाला. त्याने तिथ काय झालं हे साहेबांच्या तोंडावरून हेरलं अन पटकन आधार कार्ड वाल्या मंडळीची चावडी कडे नेऊन सगळी व्यवस्था लावली.
वणव्यासारखी गावात बातमी पसरली कि आधार कार्ड आलं आणि चावडीकडे गावकऱ्यांची इलेक्शन कार्ड, पोरांचे जन्माचे दाखले हे सगळं घेऊन झुंबड उडाली.
चावडीसमोरच्या सभागृहात सगळं गाव जमा झालं होतं. गावाची लोकसंख्या पाच सहाशे च्या घरात होती आणि सध्या नाही नाही म्हणलं तरी चारशे बाई, माणूस उपस्थित होते. गावकऱ्यांची संख्या बघून साहेबांनी गावकऱ्यांना सांगितलं कि सगळ्यांचं काम आजच नाही होणार त्यामुळे हा कार्यक्रम २, ३ दिवस चालणार आहे. आणि आज फक्त थोड्या लोकांनी थांबावं आणि बाकीच्यांनी घरी जावं.
 
साहेब बोलले तसं सगळ्या गावकऱ्यांत कुजबुज सुरु झाली. दोन मिनिटांनंतर त्याच रुपांतर "तू जा ", " तू जा कि मंग"ह्याच्यावर आलं. काही लोक तर पार हमरी तुमरी वर आले होते. "परतेक येळी तुमचीच आळी पूड कामून" चेहि सूर ऐकू येऊ लागले. पण कोणीच जायला तयार नव्हतं.
काही लोक गप गुमान बसून मनोरंजन करून घेत होते, त्यात एक साहेब सोडून आधार वाली मंडळी पण होती.
 
शेवटी साहेबांनीच एक तोडगा काढला जो सर्वांना मान्य झाला. त्यांनी प्रत्येक आळीच्या नावाने एक अश्या पाच चिठ्या टाकल्या आणि त्यातली एक निवडली. मग साहेबांनी सांगितल्या प्रमाणे त्या आळीचे लोक सोडून बाकी सगळे आपापल्या घराच्या वाटेला लागले.
 
हा सगळा गोंधळ होई पर्यंत आधार वाल्यांनी आपल्या किटा वगैरे तयार करून ठेवल्याच होत्या.
आता प्रश्न पडला कि सगळ्यात अगोदर कोणाचं कार्ड काढायचं?
पण साहेबांनी ह्याच्यावर जास्त वाद विवाद नं होऊ देता सरळ सरपंचाच्या बायकोच कार्ड काढून श्री गणेशा केला.
सरपंचाच्या कुटुंबा नंतर गुरुजींचा नंबर लागला अन 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' म्हणतात तसं अजून एक विघ्न उभं राहिलं. गुरुजींनि आधार कार्डाचे ५० रुपये द्यायला स्पष्ट नकार दिला.
गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे "आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि तो हक्क सरकार ने फुकट देऊ केलेला आहे."
आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं कि आम्ही कार्डा चे पैसे नाही घेत तर पावतीला जे ल्यामिनेशन करतोय त्याचे पैसे आहेत, पण गुरुजी काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते. त्यांनी पार वरच्या पट्टीत सूर लावला होता. म्हणजे लाच लुचपत खात्याला कळवीन वगैरे बोलू लागले तेव्हा आपल्या साहेबांना एन्ट्री घ्यावीच लागली.
साहेबांनी गुरुजीना एक कोपऱ्यात नेलं आणि दोघांची काय गुफ्तगू झाली कुणास दखल गुरुजी एकदम सुतासारखे सरळ झाले.

आधार वाल्या मंडळीच रमत गमत काम चालूच होतं तरीही त्यांनी एक एक असं करत आतापर्यंत पाच पन्नास लोकांचे कार्ड हातावेगळे केले होते. सभाग्रहामध्ये बायका आपल्या लेकरा बाळानां घेऊन बसल्या होत्या, पुरुष मंडळी मध्ये बिडी, तंबाकू ची देवाणघेवाण होत होती.काही उत्सुक मंडळी त्यात विशेष म्हणजे म्हाताऱ्या बायका  ज्यांना आधार वाल्यांच्या जेवणा ची वगैरे काळजी होती त्या ती चौकशी पण करत होत्या. असं एकंदरीत सगळं सुरळीत चालू असतानाच गुरुजीचं काम झाल्यामुळे ते आपल्या घराकडे निघाले. पण जाताना ते गावकऱ्यांचं मनोरंजन करून गेले.
बाहेर जाताना त्यांनी सभागृहाचे दार जोरात सोडले त्यामुळे ते चौकटीवर आदळले. तो आवाज ऐकून  सभागृहातच एका कोपऱ्यात झोपलेले आणि आपल्या आधार कार्ड काढायला आलेल्या पोरीचं रक्षण करायला म्हणून मागं थांबलेले गुरव आप्पा खडबडून जागे झाले अन काय झालं आहे हे न बघताच बाहेर पळत सुटले. त्यांना उठून पळतांना पाहून एक दोन गावकरी जे अर्धवट झोपेतच होते ते पण उठून पळण्याच्या तयारीतच होते. पण सभागृहामधला हशा ऐकून ते जागच्या जागीच थबकले.
पुढची पाच एक मिनिटं सगळे गावकरी पोट धरून हसत होती. साहेबांसोबतचा एक कार्यकर्ता तर पोट पकडून हसता हसता अक्षरशः लोळत होता.
फक्त एकच व्यक्ती शांत होती ती म्हणजे गुरव आप्पांची मुलगी. बिचारी शरमेनं अर्धमेली झाली होती आणि हसणाऱ्या गावकऱ्यांवर व दार आपटलेल्या गुरुजींवर चिडली होती.
थोड्या वेळाने परत सगळं पूर्ववत सुरु तर झालं खरं पण मधेच कोणी तरी खु:  खु: खु: करून हसायचं आणि परत सगळे त्यात सामील व्हायचे.
असं सगळ चालू असतानाच बेवड्या लोहाराचा नंबर आला. आधारवाल्या कार्यकर्त्याने त्याच्या कडे इलेक्शन कार्ड मागितलं. पण त्याच्याकडे ना इलेक्शन कार्ड होतं ना जन्माचा दाखला. कोणतं ओळखपत्र हि नव्हतं. तेंव्हा त्या कार्यकर्त्याने स्पष्ट सांगितलं कि तुमचं आधार कार्ड काढू शकत नाही.
पण हा गडी हट्टच धरून बसला होता कि मला आधार कार्ड पाहिजेच. आता तो बेवडा त्याच्या 'तोंडा'ला कोण लागणार?कार्यकर्त्यांनी त्याला समजावून सांगितलं कि बाबा ह्यापैक्की काहीही एक घेऊन ये आपण तुझं आधार कार्ड काढू. पण नाही गडी म्हणायचा-
"माझ्या पशी कायबी नायी मनूनच मला आधार कार्ड काडायचंय."
शेवटी साहेबांनी वैतागून त्याला सांगितलं "तुझ्याकडे हे कागदपत्र नाहीत ना, मग तू पाचशे रुपये जरी दिलेस तरी तुझं आधार कार्ड निघणार नाही." आणि सभागृहाच्या बाहेर हाकलून लावला.
गड्यांन तेच पकडलं अन गावातनं बोंब मारत फिरायला लागला कि आधार कार्ड काढायला ५०० रुपये मागत्यात. घरी जाऊन आपल्या बायकोला पण हेच सांगितलं.
आता त्याची बायको म्हणजे बंडू दादाची कार्यकर्ती तिने लागलीच बंडू दादांना फोन लावला. 

इकडे बंडू दादांचं आगमन झालंच होतं. पक्या आणि बाकी मंडळीला घेऊन ते गावातच 'बसले' होते.  
मागच्या पंचायत समितीच्या निवडणूकीला पक्क्या आणि गावातल्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं होतं. त्यामुळे बंडूदादा सगळ्यांवरच जाम खुश होते आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊनच 'बसणार' अशी भिष्म प्रतिज्ञा त्यांनी केली होती. त्यामुळे नाईलाजास्तव सगळेच कार्यकर्ते स्वर्गाच्या वाटेवर लागले होते. आणि त्यामुळेच पक्या आणि कंपनीच पृथ्वीवर 'आधार' देणाऱ्या लोकांकडे थोडसं दुर्लक्षच झालं होतं.
 
"ख..रं..रं  सांगू का बंडू दा..दा, आज आपण सर..गात हे, सर..गात , एक तर तुमच्या सारक्या भारी माणसा संग बसलुय आणि दारू बी भारीच..." एक मोठा घोट घेऊन पक्या पुढे बोलला "..हाये. फकस्त एकाच गोष्टीची कमी हाय बगा".
"ती रं आणि कोणती?" बंडू दादा पण चांगलेच फार्मात होते, त्यांनी इतक्या घाईत विचारलं कि जसं काही ते ती कमी लगेच पूर्ण करतील.
"अप्सरायची" पक्या बोलला आणि स्वतःच मोठ्याने हसायला लागला. बंडू दादा सुद्धा त्याच्या हसण्यात सामील झाले आणि एक दोन मिनिटांनी म्हणाले
" अप्सरा इथे कश्या येतील, सांग बरं , कश्या येतील?"
"का नायी यणार?" पक्या एक एक शब्द सुटा करत करत बोलला.
"आरं गावातल्या सगळ्या अप्सरा आधार कार्ड काढायल्यात नं" बंडू दादा एवढं बोलतायत नं बोलतायत तोच त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली.
मोबाईल वंरच नाव बघून ते पक्याला उद्देशून बोलले "अप्सरेचा फोन आला बघ" आणि फोन उचलला.
"साहेब , म्या टूमगावहून संगी ब्वल्तेय" बेवड्या लोहाराची बायको भीत भीतच बोलत होती.
"ह्म्म्म बोला बोला " बंडू दादा उठून थोडेसे बाजूला गेले त्यांना वाटत होतं काही विशेष "काम" असलं तर.
"हामच्या गावात बगा ते आदार कारड काडाया लोकं आलेती. अन ते पाचशे रुपय मागयलेत बगा, आता तुमीच सांगा आमी गरिबानं कसं करावं.?"
"ह्यांच्या मायला ह्यंच्या ५० घ्या म्हणलो तर हे पाचशे घ्यायलेत" बंडू दादा एकदम बोलून गेले, तसं तिने विचारलं.
"काय म्हनलात?"
"काई नाही काई नाही, मी गावातच हाये बघतो मी काय करायचं ते." दारूच्या नशेत हे काय बोलून गेलो म्हणून कप्पाळावर हात मारून घेत, गडबडीत बंडू दादा बोलले.

बंडू दादा चांगलेच संतापले होते. त्यांनीच ह्या पट्टीतल्या सगळ्या गावाचं आधार कार्ड काढायचं कंत्राट घेतलं होतं. शासनाकडून तर त्यांना हवा तसा मोबदला मिळतच होता. पण त्यांनी जनतेलाही लुटायची संधी सोडली नव्हती. दर आधार कार्डा मागे पन्नास रुपये घ्यायचे असा त्यांचा कार्यकर्त्यांना आदेश होता. ते विचार करू लागले कि माझे कार्यकर्ते माझ्या पेक्ष्या हि शहाणे निघाले ते त्यात पण फालकं मारायला बघतायत. आणि ते पण थोडं थोडक नव्हे तर चांगलं चारशे, साडे चारशे रुपये.
बंडू दादांना हा विश्वासघात सहन झाला नाही. ते तसच तडक सुदाम भाऊ आणि बाकी कार्यकर्त्यांना घेऊन चावडी कडे निघाले. चावडी तशी काय जास्त लांब नव्हतीच. पण रस्ता दगड धोंड्याचा होता. त्यात अमळ 'जास्तच' झाली होती. त्यामुळे ठेचकाळून एक दोनदा पडता पडताहि वाचले.
चावडी जवळ आल्या आल्या त्यांनी मोठ्याने गर्जना केली.
'कोण हाये रं ते आधार कार्ड काडाया पैशे मागायलय?"
बंडू दादांचा आवाज ऐकून आधार कार्ड काढणाऱ्या कार्यकर्त्या मध्ये दहशतच बसली. आणि ते एकमेकाकडे बघायला लागले. त्यांना वाटत होतं ह्यांनीच आम्हाला सांगितलं होतं कि पैसे घ्या म्हणून आणि आता हेच आमच्या वर गरम झालेत. त्यामुळे काहीतरी भानगड झालेली दिसतेय.
पण साहेब म्हणजे खमक्या माणूस होता. तो हि तेवढ्याच जोरात बोलला.
" मी घेतोय पैसे." काय म्हणणं आहे आपलं?
"आमचं एवडच म्हणणं हाये कि पैशे नाई घ्यायचे, गावकऱ्याकडून." दादा झुलत झुलत बोलत होते.
"मग तुम्ही द्या पैसे" साहेब.
"मी कामून देऊ पैशे, माझा काय संबंध?" दादा कधी ह्या पायावर तर कधी त्या पायावर असं करत उभं राहण्याचा प्रयत्न करत होते. पण खरं म्हणजे मागून एका गावकऱ्याने धरल्यामुळे ते उभे होते.
"तुमचा गावकंऱ्याशी काही संबंध नाही?" साहेबांनी गुगलीच टाकला.
"नायी म्हणजे माझा संबंध हायेच कि गावकऱ्यांशी" दादा एवढं बोलतात नं बोलतात तोच सुदाम भाऊ आवाज चढवून बोलले.
"ते कायी का आसना, पर आमी पैशे नायी देणार कार्ड काढाया."
"मग एक देखील कार्ड निघणार नाही इथून पुढे." साहेब काही हार मानायला तयार नव्हता.
सुदाम भाऊ आणि साहेबाची आता चांगलीच जुपली होती. पण इकडे बंडू दादाला समजत नव्हतं कि काय करावं ते. त्यांचाच माणूस त्यांचच ऐकत नव्हता. आणि ह्या सगळ्या गावकऱ्यासमोर त्याला झापता पण येत नव्हतं. म्हणून ते गप्प बसले. पण सुदाम भाऊ चांगलेच पेटले होते. त्यांना हि गावकऱ्यासमोर हिरो बनण्याची चांगली संधी वाटत होती. आणि सरपंच होण्याची त्यांची इच्छाहि ह्यातून पूर्ण होऊ शकते हे ते ओळखून होते.

"मग आमाला तुमचा बंदोबस करावा लागल." सुदाम भाऊंनी आपलं शेवटचं अस्त्र काढलं तसं साहेब सोडून बाकी तिघांची टरकली. त्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. त्यांना माहित होतं गावातले लोक एकदा मारायला लागले कि काही बघत नाहीत.
"बंदोबस्त करायलाच मी पोलिसांना बोलावलंय." साहेबांनी अजून एक गुगली टाकला.
आता मात्र सर्द का काय म्हणतात ते व्हायची पाळी सुदाम भाऊंची होती. त्यांना कळत नव्हतं हा माणूस आपणच खोटं वागतोय आणि आपणच पोलिसांना बोलावतोय असं का? म्हणजे नक्कीच कोण तरी मोठा माणूस असणार नाही तर ह्याच्यावर कोणीतरी मोठं असणार. त्यामुळे त्यांनी साहेबांच्या अंगाला हात लावायचं तर दूरच गपचूप एका बाजूला जाऊन बसले. 
सगळ्यांच्याच मनाला उत्सुकता लागली कि हे चाललय तरी काय? हे तर "उलटा चोर कोतवाल को डाटे" अशी गात झाली.
पण इकडे बंडू दादा आणि ते आधार कार्ड वाले तिघे यांची पाचावर धारण बसली होती. त्यांना माहित होतं कि जर पोलीस आले आणि हे जर उघडकीस आलं तर आपलं काही खरं नाही.
साहेब तसं बोलल्या नंतर एकप्रकारची विचित्र शांतता सभाग्रहात पसरली. आणि त्या शांततेचा भंग त्या तिघांपैकी एक जन करणार तेवढ्यात पोलिसांची गाडी चावडी जवळ येऊन उभी राहिली.

आता मात्र त्यांचे चेहरे कधीहि रडू कोसळेल असे झाले होते. आणि गावकऱ्यामध्ये आता काही तरी भारीच बघायला मिळणार अश्या स्वरूपातला उत्साह दिसत होता.
दोन हवालदार घेऊन इन्स्पेक्टर शिंदे आले होते. त्यांनी आल्या आल्या साहेबांसोबत दोन मिनिट काही तरी गुफ्तगू केली आणि ते बंडू दादा कडे वळले.
" चला, काठीकवडे साहेब" शिंदे हातावर रूळ आपटत बोलले.
' कुट ?" बंडू दादांची भंबेरी उडाली होती.
" पोलीस स्टेशन मध्ये" शिंदे.
शिंदे एवढं बोलतात तोच सुदाम भाऊ उसनं अवसान काढून बोलले.
" ओ साहेब तुमी 'चोर सोडून संन्याशाला फाशी" कामून देताय."
" म्हणजे?" शिंदेला तिथे काय झालं ते माहीतच नव्हतं.
" अवो ते आधार वाले साहेब पैशे मागायलेत आधार कार्ड काढायला आणि बंडू दादा अन आमी मनतोय कि आमी देणार नायी मनून, अन तुमी आमालाच आत टाकायले, खर्याची दुनिया नायी राईली साहेब." सुदाम भाऊ काकुळतिच्या सुरात म्हणाले.
शिंदेंनी एकवेळ आधार च्या साहेबाकडे हसून पाहिलं आणि दोन्ही भुवया वर उडवल्या तसं साहेबांनी मानेने होकार भरला.
इन्स्पेक्टर शिंदेंनी सगळ्या गावकऱ्यांना खाली बसवून सुरुवात केली.
"मंडळी , मी 'चोर सोडून संन्याशाला फाशी' द्यायला नाही आलोय तर खऱ्या चोराला पकडायला आलो आहे. आणि खरे चोर म्हणजे हे काठीकवडे साहेब आणि हे तिघे" आधार कार्ड काढायला आलेल्या कार्यकर्त्यांकडे बोट दाखवून शिंदे बोलले.
एवढं ऐकल्यावर गावकऱ्यामध्ये कुजबुज सुरु झाली. त्यांना शांत करून शिंदे पुढे बोलू लागले.
"तुम्हाला माहित आहे ह्या काठीकवडे साहेबांकडे आपल्या तालुक्यात जितके गाव आहेत तितक्या गावकऱ्यांचे आधार कार्ड काढायचे कंत्राट आहे. आणि त्यांच्याच सांगण्यावरून हे तिघे प्रत्येकी पन्नास रुपये घेतात.
आणि हे साहेब म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या जिल्ह्याचे नवीन कलेक्टर तुंगे साहेब आहेत."  आधार वाल्या साहेबाकडे बोट दाखवून शिंदे बोलले.
आता मात्र चित्र एकदम पालटलं होतं जो तो  कलेक्टर साहेबांकडे बघत होता. आणि आश्चर्याचे सूर उमटत होते. पण बंडू दादा आणि तिघांना मात्र एका पेक्ष्या एक मोठे धक्के बसत होते.
शिंदेनी ओळख करून दिल्यावर कलेक्टर साहेबांनी सूत्र आपल्या हातात घेतले.
" मंडळी, आम्हाला ह्या भ्रष्टाचाराची कुणकुण लागली होती म्हणूनच हा सापळा रचावा लागला. जेव्हा आम्हाला कळलं कि काठीकवडे साहेब ह्या दिवशी तुमच्या गावात येणार आहेत तेंव्हा आम्ही तुमचं गाव निवडलं आणि तोच दिवस ठरवला. म्हणजे सगळ्यांचा सोबतच पर्दाफाश करता येईल."
"पर साहेब तुमी यांच्या सोबत आलात आणि ह्यांना कळल कस नायी कि तुम्ही त्यांचे साहेब नाहीत मनून?" एका हुशार गावकऱ्याने त्या आधार वाल्या तिघांकडे बोट दाखवत प्रश्न विचारला.  
हसून साहेबांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
"त्याचं काय झालं ह्यांचा जो साहेब होता त्याला आम्ही अगोदरच ताब्यात घेतला होता. आणि त्याच्याकडून ह्या तिघांना फोन करून सांगितलं कि आज बंडू दादांनी नवीन साहेबाबरोबर जायला सांगितलं आहे. आणि तो साहेब म्हणजे मी होतो, आणि मला अजून ह्या जिल्ह्यात कोण ओळखत नव्हतं. त्यामुळे ते खपून गेलं."

कलेक्टर साहेब एवढं बोलताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळे गावकरी उत्साहाने , आनंदाने टाळ्या वाजवत होते. त्यात सुदाम भाऊ, पक्या सुद्धा होते. टाळ्या ओसरतात नं ओसरतात तोच घोषणा सुरु झाल्या.

"काठीकवडे मुर्दाबाद"... "कलेक्टर साहेब जिंदाबाद"
"काठीकवडे मुर्दाबाद"... "कलेक्टर साहेब जिंदाबाद".

बंडू दादांनी आजपर्यंत गावकऱ्यांच प्रेम बघितलं होतं. पण चिडलेली आणि दुखावलेली जनता काय करू शकते याचा प्रत्रेय त्यांना आज येत होता.